मुंबई – राज्यातील दोन दिवसाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाला सुरुवात होण्याआधीच विरोधकांनी विधानसभेबाहेर आंदोलन केले होते. यातच गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारण निशाणा साधला.
धनगर समाजाच्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर खास धनगरी वेष परिधान करुन आणि ढोल वाजवत आंदोलन केलं. त्यावेळी पोलिसांकडून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि सदाभाऊ खोत यांनी पोलिसांना रोखत पडळकरांना आपलं आंदोलन करु दिलं. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर एकही बैठक घेतली गेली नाही. महाविकास आघाडी सरकारमधीलच काही नेते पिवळा फेटा, खांद्यावर घोंगडी, हातात काठी घेऊन धनगर आरक्षणावर प्रश्न विचारत होते. मग आता तेच नेते गप्प का? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केलाय.
देवेंद्र फडणवीस यांनी जे आदिवासींना तेच धनगरांना दिलं होतं. धनगरांसाठी 500 कोटी रुपयांची तरतूद केली होती. पण त्यातील एक रुपयाही महाविकास आघाडी सरकारनं दिला नाही. यशवंत महामेश योजनाही राज्य सरकारनं रद्द केली. हे सरकार धनगर, भटक्या विमुक्त समाजाच्या विरोधात असल्याचा गंभीर आरोपही पडळकरांनी केला आहे.