“दुधाला अनुदान मिळावे म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाने राज्यातील 191 तालुक्यात विठ्ठलाच्या मूर्तीला दुधाचा अभिषेक घालत आंदोलन केले. सरकारला शेतकऱ्यांबद्दल कणव वाटली पाहिजे.” असे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांनी व्यक्त केले.
राज्यात दुधाच्या दराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करणारा दूध व्यवसाय आहे. सध्या दुधाच्या दारात घट झाली आहे. शेतकऱ्यांकडून कमी दराने दूध विकत घेतले जात आहे आणि ग्राहकाला ते जास्त दराने विकले जात आहे . शेतकऱ्यांना मोठा भुर्दंड सोसावा लागत आहे. काल दुपारी माजी खासदार राजू शेट्टी यांनी दुधाच्या मुद्द्यावर सरकारवर टिका केली आहे. गेल्या दोन आठवडयापासून राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते दुधाला अनुदान द्या म्हणून आंदोलन करत आहेत.
“राज्यातील 191 तालुक्यात दुधाला अनुदान द्यावे, म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विठ्ठलाच्या मूर्तीला दुधाचा अभिषेक करत आंदोलन केले आहे. आगळेवेगळे आंदोलन करून आम्ही सरकारचे लक्ष वेधून घेतले आहे. सरकारने शेतकऱ्यांना दिलासा द्यायला हवा,” असे महादेव जानकर म्हणाले.