कोल्हापूर: महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळची निवडणूक नुकतीच पार पडली. पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यामध्ये बाजी मारली. गोकुळ दूध उत्पादक संघात तब्ब्ल २५ वर्षानंतर सत्ता परिवर्तन झाले. त्यातच लागोलाग हसन मुश्रीफ आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात वाद निर्माण झाला. काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळ यांना तुम्ही जामिनावर बाहेर आला आहात, त्यामुळे जरा सांभाळून बोलत जा असा सूचक इशारा दिला होता.
यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. या आधीदेखील चंद्रकांत पाटील यांनी आमचा अपमान केलेला आहे आणि लोकशाहीमध्ये असे धमकी देणे आणि बदनामी करणे योग्य नाही. आता मी त्यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल करणार असे मुश्रीफ म्हटले होते. त्यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हटले होते की हसन मुश्रीफ यांनी माझ्यावर खुशाल अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा. मी त्यांना अजिबात घाबरत नाही. माझ्याकडे काही जास्त प्रॉपर्टी नाही.
माझी सर्व प्रॉपर्टी विकली तरी १०० कोटीच काय तर १ कोटीही मिळणार नाहीत. त्यामुळे मुश्रीफ साहेबांनी खटला जिंकला तर त्यांना मलाच विकावे लागेल असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला होता. आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना पुन्हा उत्तर दिले आहे. चंद्रकांत जी प्रॉपर्टी ची काळजी तुम्ही नका करू. मला तुम्ही जमवून ठेवलेली माया कुठे लपून ठेवलेली आहे हे चांगले माहित आहे. आता चंद्रकांत पाटील मुश्रीफांना काय उत्तर देतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.