कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय सर्व मंडळे आणि राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे यंदाचा गणेशोत्सव कसा साजरा करावा यासाठी सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्य़ात आल्या आहेत
मुंबईत साधारणत: साडेबारा हजार गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यांच्यासाठी यंदाचा गणेशोत्सव पूर्णत्वास नेणे ही तारेवरची कसरत असणार आहे. कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे गणेशोत्सवात गर्दी झाल्यास कोरोना संसर्गाचा धोका अधिक वाढणार आहे. त्यामुळेच राज्य सरकारने यावर्षी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे.
- सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार न्यायोचित पूर्वपरवनागी घेणे आवश्यक राहणार आहे.
- कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच मा. न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण याच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरातील तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी,
- श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती गणपती २ फूटांच्या मर्यादेत असावी.
- या वर्षी शक्यतो पारपारिक गणेशमूर्ती ऐवजी घरातील धातू/संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे. शाडू किवा पर्यावरणपुरक मूर्ती असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे, ते शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम तलावात विसर्जन करावे. गणेशमूर्तीचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास या मूर्तीचे विसर्जन माघी गणेशोत्सव विसर्जनावेळी किंवा २०२१ च्या भाद्रपद महिन्यातील विसर्जनाच्या वेळी करता येणे शक्य आहे. जेणेकरुन आगमन विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळून स्वत: व कुटुंबियांचे कोरोना साथीच्या रोगापासून रक्षण होईल
- उत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्याचा स्वीकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास प्राधान्य देण्यात यावे.
- सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबीरे उदा. रक्तदान, आयोजित करण्यास प्राधान्य द्यावे. तसेच कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय याबाबत जनजागृती करण्यात यावी,
- आरती, भजन, किर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही. तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करण्यात यावे