राफेल विमान गेमचेंजर ठरतील असे भाजपाकडून म्हटले जात आहे. आता यावर राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी भाष्य केले आहे. राफेल विमानांमुळे चीनची चिंता वाढेल असं मला वाटत नाही, हे गेमचेंजर वगैरे ठरणार नाही. असं ते म्हणाले आहेत.
‘राफेल विमानं भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट होत आहेत. ही आपल्या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं चांगली गोष्ट आहे. मात्र, ही विमाने गेमचेंजर वगैरे ठरणार नाहीत. त्यामुळं चीनची चिंता वाढेल असं मला वाटत नाहीत. राफेल आल्यामुळं चुटकीसरशी आपल्या सर्व चिंता मिटतील असा जो काही समज पसरवला जातोय तो चुकीचा आहे,’असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.
‘भारताच्या संरक्षण सिद्धतेकडे आणि तयारीकडे चीन गंभीरपणे पाहत असेल यात शंका नाही. मात्र, राफेल आल्यामुळं चीनची चिंता वाढेल, असं मला वाटत नाही. चीनची ताकद आपल्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे. लष्करी ताकदीच्या बाबतीत त्यांच्याशी आपली तुलना होणे शक्य नाही. आपल्याकडे दहा लढाऊ विमानं असतील तर त्यांच्याकडे हजार विमानं आहेत. एवढा फरक आहे असंही पवारांनी स्पष्ट केलं.