राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र खुद्द सचिन पायलट यांनी भाजपमध्ये जाणार नसल्याचं सांगितलं आहे.
राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट काँग्रेस सोडणार की नाही नाही याबाबत संभ्रमाचं वातावरण आहे. कारण सचिन पायलट काँग्रेसला रामराम करुन भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र आपण भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, असं स्पष्टीकरण खुद्द सचिन पायलट यांनीच दिलं आहे. एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना त्याने हे स्पष्ट केले असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, राजस्थानच्या सत्तासंघर्षात एक मोठी घडामोड घडली. राजस्थानमधील अशोक गहलोत यांचं सरकार अल्पमतात असल्याचा दावा राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी केला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन पायलट यांच्या कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात 30 आमदारांचं त्यांना समर्थन असल्याचंही म्हटलं होते.