लातूर शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादूर्भाव वाढतच चाललेला आहे. त्याअनुषंगाने लातूर महापालिकेने हा प्रादूर्भाव रोखण्यासाठी `धारावी मॉडेल` कशा पद्धतीने येथे राबवता येईल यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री व पालकमंत्री अमित देशमुख यांनी महापालिकेला केली आहे
धारावीने कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या त्या उपाययोजनांची लातूर महापालिका क्षेत्रात अंमलबजावणी करण्याबाबत महापालिकेने प्रयत्न करावेत. याकरिता हॉटस्पॉट ठरत असलेल्या भागातील सर्व लोकांची एकाच दिवशी टेस्ट करणे तसेच त्या लोकांना एखाद्या ठिकाणी शिफ्ट करून चौदा दिवस क्वारंटाईन करणे अशा उपाय योजना राबविण्याबाबत चाचपणी करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
महापालिकेने सर्व १८ प्रभागांमध्ये प्रत्येकी एक स्वॅब कलेक्शन सेंटर निर्माण करावे व त्या ठिकाणी आवश्यक आरोग्य कर्मचारी नेमून त्या प्रभागातील लोकांचे स्वॅब घेण्याची व्यवस्था करावी. त्याप्रमाणेच महापालिकेने चेस दी वायरस या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर मास टेस्टिंग करावी. महापालिकेने प्रभाग निहाय टास्क फोर्सची निर्मिती करावी व या प्रभागाची जबाबदारीसाठी अधिकाऱ्यांच्या टीम तयार कराव्यात. या करीता स्थानिक नगरसेवकांची मदत घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
वाढत्या #कोविड१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लातूर महानगरपालिका पदाधिकारी,अधिकारी यांची आढावा बैठक घेतली.शहरात धारावी धरतीवर उपाययोजना राबवाव्यात,प्रत्येक प्रभागात शॉब कलेक्शन सेंटर उभारावे, संभाव्य संकट लक्षात घेता नव्याने १००० बेडची व्यवस्था करून ठेवावी असे निर्देश दिले आहेत pic.twitter.com/ZQBjpU04oP
— Amit V. Deshmukh (@AmitV_Deshmukh) July 29, 2020