कराड: अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतराव मोहिते पाटील कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. कोरोना महामारीच्या संकटकाळात निवडणूक प्रक्रिया पार पडत असल्याने अनेक सामाजिक संघटनांनी ही निवडणूक काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात यावी यासाठी प्रयत्न केले होते.मात्र आता निवडणूक अंतिम टप्प्यात आल्याने सत्ताधारी गट आणि विरोधी गटातील इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज गर्दी केल्याचे दिसून आले आहे. उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाल्यापासून सत्ताधारी गट काही बॅकफूटवर गेल्याचे चित्र निर्माण झाले होते.
आज मात्र सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले गटाने आपला गिअर चेंज केला आहे. कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी आज सत्ताधारी गटाकडून विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले यांनी जयवंतराव भोसले सहकार पॅनल कडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पाच वर्षात केलेली विकासकामे आणि सभासदांच्या अपेक्षांची केलेली पूर्तता हाच निवडणुकीचा मुद्दा असल्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी सांगितले आहे. सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले यांच्या गटासमोर कारखान्याचे माजी चेअरमन आणि संस्थापक पॅनलचे अध्यक्ष अविनाश मोहिते गट, रयत पॅनलचे डॉ. इंद्रजित मोहिते गट यांचे कडवे आव्हान उभे करण्यात आलेले आहे.
मागील निवडणुकीत ज्या अपेक्षेने सभासदांनी आम्हाला निवडून दिले त्या अपेक्षा पूर्ण करण्यात जयवंतराव भोसले सहकार पॅनल सत्ताधारी गटाला यश आले आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाने आश्वासन पूर्ण केली आहेत आणि हाच प्रमुख मुद्दा घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत असे विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी म्हटले आहे. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा कारभार चांगला चालत असल्याने विरोधकांकडे निवडणुकीसाठी कोणताच मुद्दा नसल्याने विरोधक गोंधळात पडले आहेत असे डॉ अतुल भोसले यांनी म्हटले आहे.