पुणे : सत्ता बदलाचं केंद्र असलेल्या हडपसर मतदारसंघात यंदा महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी लढत निश्चित झालीय. राज्यात तयार झालेल्या नवीन राजकीय समीकरणांमुळं सुरूवातीला उमेदवारीसाठी मोठी चुरस बघायला मिळतेय. परंतु महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तेब करण्यात आला. तर महायुतीकडून विद्यमान आमदार चेतन तुपे यांना उमेदवारी मिळाली. याठिकाणी मनसेचे साईनाथ बाबर देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
हेही वाचा…शरद पवार पिंपरी-चिंचवडमध्ये निवडणुकीसाठी रणशिंग फुंकणार ; पण…. ?
२०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या चेतन तुपे यांनी भाजपच्या योगेश टिळेकर यांचा अवघ्या काही मतांनी पराभव केला आणि ही जागा राष्ट्रवादीच्या ताब्यात आणली. मात्र राज्यात झालेल्या पक्ष फुटीत चेतन तुपे यांनी अजितदादांची साथ दिली. ज्यांचा आमदार, त्यांचा मतदारसंघ या गणितामुळे हा जागा चेतन तुपे यांनाच जाणार होती. मात्र शिवसेना शिंदे गटाकडून शहाराध्यक्ष नाना भानगिरे यांनीही मतदारसंघावर दावा सांगितला होता. तर महाविकास आघाडीतही उमेदवारीवरून रस्सीखेच बघायला मिळाली. याठिकाणी ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर हेही इच्छूक होते. मात्र सरतेशेवटी जयंत पाटील यांनी प्रशांत जगताप यांची उमेदवारी जाहीर केली.
हेही वाचा…“माधुरीताईंचा चौथा विजय हा रेकॉर्ड ब्रेक होईल”, पर्वतीत देवेंद्र फडणवीसांनी सभा गाजवली
राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर प्रशांत जगताप शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ राहिलेत. त्याआधी आणि नंतरही त्यांनी पुण्यातील जवळपास सगळ्याच आंदोलनात सहभाग घेतला. राष्ट्रवादी शरद पवार गटाची भूमिका ते सातत्याने मांडत राहिलेत. त्याच निष्ठेचे फळ त्यांना विधानसभेची उमेदवारी म्हणून मिळाली. दुसऱ्या बाजूला चेतन तुपे यांच्यावर महायुतीने पुन्हा विश्वास टाकला आहे. मागच्या निवडणुकीत चेतन तुपेंच्या अवघ्या काही मतांनी विजय झाला होता. त्यामुळे त्यांना यंदाच्या निवडणुकीत चांगलीच मेहनत करावी लागणार आहे.
चेतन तुपे आणि प्रशांत जगताप यांच्या लढाईत मनसेचे साईनाथ बाबर देखील मैदानात उतरले आहेत. वसंत मोरे यांना पदावरून दूर केल्यानंतर साईनाथ बाबर हे मनसेचे शहराध्यक्ष झालेत. त्यानंतर आता त्यांनी विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे साईनाथ बाबर कुणाची मतं घेणार ? त्यावर हडपसर मतदारसंघातील राजकीय गणितं अवलंबून राहणार आहे.
हडपसर मतदारसंघाचा इतिहास
२००९ साली झालेल्या हडपसर विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या महादेव बाबर यांनी ६५,५१७ मते मिळवत विजय मिळवला होता. यावेळी महादेव बाबर, मनसेकडून वसंत मोरे आणि काँग्रेसकडून बाळासाहेब शिवरकर यांच्यात लढत झाली. महादेव बाबर यांनी १० हजारांचं लीड घेत विजय मिळवला. त्यानंतर मात्र मोदी लाटेमध्ये २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या योगेश टिळेकर यांनी ८२,६२९ मते मिळवत दणदणीत विजय मिळवला. २०१९मध्ये भाजपचे योगेश टिळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे आणि मनसेकडून वसंत मोरे हे निवडणुकीच्या रिंगणात होते. मोदी लाट कायम असताना योगेळ टिळेकर यांना हडपसरची जागा राखता आली नाही. आणि या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या चेतन तुपे यांनी ९२,३२६ मते मिळवत टिळेकरांना पराभूत केले.
READ ALSO :
हेही वाचा…उद्धव ठाकरेंचा जाहीरनामा प्रसिद्ध..! काय काय केल्या घोषणा ?
हेही वाचा…“बळीराजाला वाचवण्यासाठी राज्यात आघाडीचं सरकार यावं”, शरद पवारांचा विश्वास
हेही वाचा…चंद्रकांतदादांच्या पुढाकारामुळे मुस्लिमांची अतिक्रमणे हटली !
हेही वाचा…सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर टिका, अजित पवार संतापले, म्हणाले…