मुंबई : ‘कलर्स’ वाहिनीच्या ‘बिग बॉस’ या रियालिटी शोमध्ये दररोज नवनवे वाद पाहण्यास मिळत आहेत. या शोमधील स्पर्धक जान कुमार सानू यानं मराठी भाषेबद्दल काही आक्षेपार्ह शब्द उच्चारले होते. जान कुमारच्या या वक्तव्यानंतर मनसे आणि शिवसेनेने कलर्स वाहिनीला इशारा दिला होता. यानंतर कलर्स वाहिनीनं झालेल्या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून महाराष्ट्राची माफी मागितली होती.
माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल. मला मराठी ऐकून चीड येते, असं जान कुमार सानू म्हणाला होता. त्याच्या या वक्तव्यानंतर तीव्र पडसाद उमटले होते.
कलर्स वाहिनीनंतर आता जान कुमार सानू यानेदेखील माफी मागितली आहे. बिग बॉसच्या कन्फेशन रूममध्ये जान सानूला समजही देण्यात आली. यावेळी त्याने माफी मागितली.
मी काही दिवसांपूर्वी नकळत एक चूक केली. त्यामुळे मराठी भाषिकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे मी सर्वांची माफी मागतो. मराठी भाषिकांना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता, अशा शब्दात जान याने माफी मागितली.