कोरोना व्हायरस महामारी संकटाच्या काळात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या राज्याचा दौरा करत आहे. या दौऱ्यात ते राज्य सरकारवर सडकून टीका करत आहे. ‘सत्ताधारी घरी बसले आहेत, त्यांना लोकांची चिंता नाही. त्यांनी आमच्या दौऱ्यावर कीतीही टीका केली तरी लोकांना बरे वाटते की कुणी तरी आमची दु:ख पाहत आहे. आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसारखे राजकारण करीत नाही, आम्ही राजकारण जनतेकरीता करतो, असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. ते जळगाव दौऱ्यावर असताना बोलत होते.
फडणवीस यांनी जळगावमध्ये कोव्हिड रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार गिरीश महाजन यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी होते.
यावेळी फडणवीस म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात अधिक रुग्णसंख्या आहे. त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज आहे. येथे मोठ्या प्रमाणात टेस्टिंग वाढविण्याची गरज आहे. सध्या प्रमाणापेक्षा कमी टेस्टिंग होत आहे. टेस्टिंगचे अहवाल चार चार दिवस येत असल्याने संसर्ग वाढून रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. २४ तासांत अहवाल येणे आवश्यक असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.