सध्या अनेक राज्यांमध्ये राजकीय घडामोडीना वेग आला आहे. त्यातच जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे आज पंढरपूरमध्ये आहेत. पक्षाच्या बैठकीसाठी त्यांनी पंढरपूर दौरा केला. यावेळी ते हेलिकॉप्टरने पंढरपुरात पोहोचले. मात्र सध्या लॉकडाऊन आणि अनलॉकिंग सुरु असताना, हेलिकॉप्टरबाबत त्यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी हेलिकॉप्टरची लिफ्ट मिळाली म्हणून आलो असं उत्तर दिलं.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उजनी धरणावर राष्ट्रवादी पक्ष कार्यकर्त्यांची बैठक आयोजीत केली होती. परंतु, जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असल्यामुळे मंत्री पाटील यांच्या खासगी हेलिकॉप्टरला उतरण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे त्यांचे हेलिकाॅप्टर पंढरपूरकडे वळले.
त्यानंतर त्यांनी तातडीने पंढरपूर येथील शासकीय विश्राम गृहात बैठक घेतली. बैठकीस जिल्हा कार्याध्यक्ष बळीराम काका साठे,प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे,आमदार भारत भालके, बबन शिंदे, यशवंत माने, युवक शहराध्यक्ष संदीप मांडवे, जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील आदी उपस्थित होते. पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकी नंतर उजनी पाणी वापट आणि नियोजना संदर्भात ही अधिकारी आणि आमदारांशी चर्चा करण्यात आली.
दरम्यान, सध्या लॉकडाऊन आणि अनलॉकिंग सुरु असताना संतांच्या पालख्या हेलिकॉप्टरने पंढरपुरात आणण्यास सरकारने परवानगी नाकारली आणि खुद्ध सरकारचे मंत्री हेलिकॉप्टरमधून लिफ्ट घेऊन पंढरपुरात आल्याने आत राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याचे चिन्ह आहेत.