राजस्थानमध्ये बंडाचे निशाण फडकवून आपल्याच सरकारला आव्हान देणारे सचिन पायलट यांच्याबद्दल काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदावरुन हटवण्यात आले. उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरूनही सचिन पायलट यांना हटवण्यात आलं आहे. त्यांच्याऐवजी गोविंद सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली.
सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी केल्यानंतर भाजपाचे नेते आणि सचिन पायलट यांचे जूने मित्र ज्योतिरादित्य शिंदे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. सध्याच्या परिस्थितीत काँग्रेस पक्षात क्षमतेला स्थान नाही. अशी परिस्थिती प्रत्येक राज्यात दिसून येत आहे, असं ज्योतिरादित्या शिंदे यांनी सांगितले.
भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा उमा भारती यांची ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी मध्य प्रदेशमधील काँग्रेसवर आरोप केले आहे. मध्य प्रदेशात १५ महिने काँग्रेसने व्यापार आणि भ्रष्टाचाराचं सरकार चालवलं. त्यामुळे राज्यातील जनतेचा अपेक्षा भंग झाला, असा आरोप ज्योतिरादित्य शिंदे यांनी केला आहे.