अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना बॉलिवूडमधील घराणेशाहीला सतत विरोध करताना दिसत आहे. याप्रकरणी दिग्दर्शक करण जोहर, सलमान खान, एकता कपूर यांच्यावर सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका होत आहे. दरम्यान करण जोहरचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये करण जोहरचा कंगनावर असलेला संताप स्पष्ट झळकत आहे. “कंगनाने प्रत्येकवेळी असं भासवलं आहे की तिच्यावर इंडस्ट्रीमध्ये कायम अन्याय होत आला आहे. असं असेल तर तिने खुशाल कलाविश्वाला रामराम ठोकावा. कोणीही तिला थांबवणार नाही”, असे वक्तव्य करण जोहरने केले आहे. दरम्यान, सध्या सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये वादळ आलेले आहे.
१३ जुन रोजी सुशांतने अखेरचा श्वास घेतला. मात्र त्याच्या आत्महत्येमागील रहस्य अद्याप उलगडलेले नाही. याप्रकरणी आतापर्यंत ३५ पेक्षा जास्त जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.