कराड: अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतराव मोहिते पाटील कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. कोरोना महामारीच्या संकटकाळात निवडणूक प्रक्रिया पार पडत असल्याने अनेक सामाजिक संघटनांनी ही निवडणूक काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात यावी यासाठी प्रयत्न केले होते. काल बुधवारी शासकीय सुट्टी असल्या कारणाने एकही अर्ज दाखल केला गेला नव्हता. आज मात्र पुन्हा एकदा उमेदवारी अर्ज विकत घेण्यासाठी आणि भरण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
कृष्णा काठावर यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी होणार यावर खलबत चालू होतं. आज मात्र विरोधी गटातील संस्थापक पॅनलच्या वतीने कारखान्याचे नेते अविनाश मोहिते पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अजूनही अविनाश मोहिते आणि डॉ. इंद्रजित मोहिते यांच्यात समेट होतो न होतो तेच अविनाश मोहितेंनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांना सोबत घेऊन अविनाश मोहिते यांनी दुपारी उमेदवारी अर्ज भरला आहे.
अविनाश मोहिते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे लोकप्रिय चेअरमन आहेत. संस्थापक पॅनलचे अध्यक्ष अविनाश मोहिते पाटील यांनी कृष्णाच्या काठावर संस्थापक पॅनल च्या नावाने एक लोकलढा उभा केलेला आहे. कारखान्याचे चेअरमन असताना त्यांनी सभासदांसाठी मोठे कार्य केलेले आहे. अविनाश मोहिते आणि डॉ. इंद्रजित मोहिते यांना एकत्र आण्यासाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण,राज्यमंत्री विश्व्जीत कदम हे विशेष प्रयत्न करत आहेत. आता डॉ. इंद्रजित मोहिते पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.