कराड: सांगली आणि सातारा जिल्हाचे कार्यक्षेत्र असणाऱ्या यशवंतराव मोहिते पाटील कृष्णा साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास देखील सुरुवात झालेली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले गट,डॉ. इंद्रजित मोहिते गट आणि अविनाश मोहिते गट यांच्यात कृष्णा कारखान्यासाठी मुख्य लढत होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात असल्याने आता नेत्यांची आणि इच्छुकांची गर्दी पाहायला मिळणार आहे.
सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले आणि डॉ. अतुल भोसले यांनी जयवंतराव भोसले सहकार पॅनल मधून पुन्हा एकदा उमेदवारी अर्ज भरत आघाडी घेतली आहे. सहकार पॅनल च्या विरोधात तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी संस्थापक पॅनल आणि रयत पॅनल प्रयत्नशील आहे. यामध्ये बोरगाव-रेठरे हरणाक्ष गटात संस्थापक पॅनलकडून केदार शिंदे, उदय शिंदे, तर नेर्ले गटाकडून विद्यमान संचालक सुभाष पाटील, रयत पॅनलकडून इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष आनंदराव मालगुंडे तर याच गटातून सहकार पॅनलकडून विद्यमान संचालक संजय पाटील यांच्या उमदेवारीवर आता अंतिम शिक्कामोर्तब होणे बाकी राहिले आहे.
सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या विरोधात डॉ. इंद्रजित मोहिते आणि अविनाश मोहिते यांच्यात मनोमिलन होईल की नाही हे अजून निश्चित झालेले नाही. निवडणूक अंतिम टप्यावर असताना देखील मनोमिलन बाळगल्याने आता मनोमिलनाच्या आशा धूसर झाल्या आहेत. अविनाश मोहिते यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर डॉ. इंद्रजित मोहिते यांना काँग्रेसने ताकद दिल्याने त्यांच्यातील दुरावा वाढत चालला आहे. जलसंधारणमंत्री जयंत पाटील यांच्या समर्थकांचा रयत आणि संस्थापक या दोन्ही पॅनल मध्ये भरणा असल्याने त्यांच्याही भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे. तिन्ही पॅनलमधील उमेदवार जवळपास निश्चित झालेले आहेत आणि आता फक्त प्रचाराची औपचारिकता शिल्लक आहे.