कराड: सांगली आणि सातारा जिल्हाचे कार्यक्षेत्र असणाऱ्या यशवंतराव मोहिते पाटील कृष्णा साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. कारखान्याच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले गट,डॉ. इंद्रजित मोहिते गट आणि अविनाश मोहिते गट यांच्यात कृष्णा कारखान्यासाठी मुख्य लढत होणार आहे. १ जूनला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि आता अर्ज छाननी देखील झालेली आहे.
निवडणुकीच्या काळात वेळेला विशेष महत्व असते. वेळेवरच घाव घातला तर लक्ष्य साधण्यास मदत होते आणि लढाई आपल्या टप्प्यात आणून जिंकता देखील येते. वेळ निघून गेल्यास हातात येणारे सत्ताकेंद्र आपसूकच दुसऱ्याच्या हातात जाते हा इतिहास आहे. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीतही तसेच काहीतरी घडत आहे असे म्हणायला हरकत नाही. डॉ सुरेश भोसले यांचा सत्ताधारी जयवंतराव सहकारी पॅनल हा यावेळेस देखील पूर्ण ताकदीने लढण्यास तयार झालेला आहे आणि विरोधी मोहिते गटाला सुरुंग लावण्यासाठीची पूर्ण तयारी देखील त्यांची झाली आहे.
डॉ. इंद्रजित मोहिते आणि अविनाश मोहिते यांना एकत्रित आण्यासाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विशेष ताकद लावलेली आहे. राज्यमंत्री विश्व्जीत कदम, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील दोन्ही मोहितेंनी एकत्र यावे असे सांगितले आहे. उमेदवारी अर्ज भरून झाले आहेत आणि आता प्रचारालाही सुरुवात होईल मात्र अजूनही दोन्ही मोहितेंच्या बैठकाच सुरु आहेत. आता पर्यंत साताऱ्यात ८ आणि जिल्ह्याबाहेर ६ ते ७ बैठका झालेल्या आहेत. असेच चालू राहिले तर दोन्ही मोहितेंच्या हातातून “हिच ती योग्य वेळ” निघून जाणार आणि त्याचा फायदा निश्चितच भोसले गटाला होणार हे सत्य आहे. आता कीती दिवस मनोमिलन लांबणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.