कराड: पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतराव मोहिते पाटील कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. . कोरोना महामारीच्या संकटकाळात निवडणूक प्रक्रिया पार पडत असल्याने अनेक सामाजिक संघटनांनी ही निवडणूक काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात यावी यासाठी प्रयत्न केले होते. मात्र आता निवडणूक होणार आणि यावेळी देखील कृष्णा सहकारी साखर कारखान्यात परिवर्तनाची लाट येणार की पुन्हा एकदा सहकार पॅनलचा कारखान्यावर दबदबा राहणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
कृष्णा सहकारी साखर कारखान्यासाठी आता तीनही पॅनलने प्रचाराचा नारळ फोडत भेटीगाठींचा धडाका लावला आहे. मात्र काही भागात इच्छुक उमेदवारांची तोबा गर्दी असल्याने पॅनलप्रमुखांना उमेदवारी देताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. महिला राखीव गटामध्ये रेठरे हरणाक्ष-बोरगाव गटामधून तब्ब्ल ९ महिला उमेदवार इच्छुक असल्याने आता निवणुकीची रंगत वाढणार आहे. कोणत्याही पॅनल ने उमेदवारी निश्चित केल्यानंतर त्यांना उमेदवारांचे अर्ज माघे घेण्यासाठी देखील याभागात मोठी ताकद लावावी लागणार आहे.
कृष्णा कारखान्याच्या संचालक मंडळात दोन जागा महिलांसाठी राखीव आहेत. सहकार पॅनलकडून विद्यमान संचालिका जयश्री माणिकराव पाटील , संगीता सुनीता पाटील – बहे , डॉ . किशोरी दीपक मोहिते – बिचूद, संस्थापक पॅनलकडून बहेचे माजी संचालक संभाजी दमामे यांच्या पत्नी मीनाक्षीदेवी संभाजी दमामे , बोरगावचे माजी संचालक उदयसिंह शिंदे यांच्या पत्नी स्नेहल उदयसिंह शिंदे यांनी तर रयत पॅनलकडून कृष्णाचे माजी उपाध्यक्ष राजेसाहेब थोरात यांच्या स्नुषा सत्त्वशीला उदयसिंह थोरात, बहे येथील नानासाहेब महाडिक पतसंस्थेचे व्यवस्थापक मानसिंग पाटील यांच्या मातोश्री व बहेच्या माजी उपसरपंच सावित्री शिवाजी पाटील , माजी संचालक पैलवान हणमंतराव पाटील – शिरटेकर यांच्या स्नुषा सुरेखा जयकर पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत .