मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांचा मुलगा आशुतोषने टि्वटरवरुन याबाबत माहिती दिली. ते 85 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर लखनऊ येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. ते व्हेंटिलेटवर होते.
सोमवारी रात्री उशिरा लालजी टंडन यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, अशी माहिती मेदांता हॉस्पिटलचे संचालक डॉ. राकेश कपूर यांनी दिली होती. त्यांची कोरोना चाचणी देखील करण्यात आली होती, मात्र त्यांचा रिपोर्ट नेगेटिव्ह आला होता.
लालजी टंडन यांच्यावर लखनऊच्या गुलाला घाट येथे आज सायंकाळी 4.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती आशुतोष टंडन यांनी दिली.
लालजी टंडन हे आधी बिहारचे देखील राज्यपाल होते. त्यांनी उत्तर प्रदेश मंत्रिमंडळात नगरविकास मंत्री म्हणूनही काम पाहिले होते. 1978-84 या कालावधीत उत्तर प्रदेश विधानपरिषदेचे सदस्य होते. तर 1996 ते 2009 दरम्यान सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडून आले.