राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर लॉकडाऊनच्या काळापासून ग्रामीण भागात फिरत आहेत. निसर्गाच्या कुशीत राहून, अध्यात्मिक ग्रथांचे वाचन करत आहे.
एका दैनिकाशी बोलताना जानकर यांनी सांगितले की, निसर्गाच्या कुशीत, अध्यात्मिक वाचन, अराजकीय तरुणांना राजकारणात आणण्यासाठी प्रयत्न हे मुख्य उद्देश ठेवून मी असा रानावनात भटकत आहे. राजकारणात असल्याने मला कार्यकर्ते भेटायला येणे साहजिकच आहे. कितीही प्रयत्न केला तरी फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे कठीण होते. एक प्रकारे ही कृती म्हणजे प्रशासनाला असहकार्यच आहे. त्यामुळे मी माझा सर्व लवाजमा, सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवून एखाद्या वनवासी व्यक्तीसारखं रानावनात भटकण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले.
जानकर लॉकडाऊननंतर पैठण तालुक्यातील गुंतेगाव येथे राहत आहेत. या काळात ते अनेक कार्यकर्त्यांच्या घरी मुक्काम करत आहेत. एका मठ्ठात देखील त्यांचा दीड महिना मुक्काम होता.
काही दिवसांपुर्वीच जानकर यांचा बैलगाडीवर प्रवास करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यांनी सांगितले की, या काळात अनेकदा हाताने स्वयंपाक केला. शेतीच्या कामात देखील मदत केली. बैलगाडी, दुचाकीवरून प्रवास केला. तसेच 1 ऑगस्ट रोजी पंढरपूर येथील दूध आंदोलनात देखील सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.