नगर : अहिल्यानगर येथे झालेल्या ६७ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पंचांच्या निर्णयावरून मोठा गोंधळ निर्माण झाला होता. शिवराज राक्षे यांनी पंचाला लाथ मारल्याच्या घटनेमुळे हा वाद चिघळला. या स्पर्धेतील निकालांवर राज्यभरातून नाराजी व्यक्त होत असताना, आमदार रोहित पवार यांनी कर्जत मतदारसंघात स्वतंत्र महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन केले. मात्र, या स्पर्धेला अधिकृत मान्यता नसल्याने ती केवळ राजकारणासाठी आयोजित केली जात असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सचिव संदीप भोंडवे यांनी केला आहे.
महायुतीतील तणाव निवळतोय? उपमुख्यमंत्री शिंदेंना ‘त्या’ समित्यांमध्ये स्थान
या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि संघाने या स्पर्धेविरोधात पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन देत आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी रोहित पवार यांना पाठवलेल्या पत्रात, या स्पर्धेतील प्राविण्यधारक कुस्तीगीरांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे की नाही, तसेच त्यांना राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे का, याबाबत खुलासा करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, १२ मार्च रोजी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत या मुद्द्यांवर कोणतीही स्पष्टता देण्यात आली नाही. तसेच, स्पर्धेबाबत चुकीची माहिती प्रसारित केल्याचा आरोपही कुस्तीगीर संघाने केला आहे.
संघाच्या मते, कर्जत येथे होणारी ही स्पर्धा निमंत्रित स्वरूपाची आहे की शासकीय मान्यतेची, याबाबत आयोजकांनी स्पष्टीकरण द्यावे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील विजेत्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत असल्याने अनेक कुस्तीगीर मोठ्या खर्चाने या स्पर्धेत सहभागी होतात. त्यामुळे, या स्पर्धेतील प्राविण्यधारकांना खालील गोष्टींचा लाभ मिळणार आहे की नाही, यावर स्पष्टता देण्याची मागणी करण्यात आली आहे:
- आर्थिक मानधन मिळणार आहे का?
- सरकारी नोकरीत ५% आरक्षणाचा लाभ मिळणार आहे का?
- शालांत परीक्षेत गुण सवलत मिळणार आहे का?
- शिवछत्रपती पुरस्कारासाठी गुणांकन स्वीकारले जाणार आहे का?
- किताब विजेत्याला सरकारी पेन्शन स्वरूपात मानधन मिळणार आहे का?
यासंबंधी कोणताही खुलासा न झाल्यास, महाराष्ट्रातील कुस्तीगीरांची फसवणूक झाल्याच्या कारणावरून आयोजकांविरोधात कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संघाने केली आहे. आता यावर रोहित पवार आणि आयोजकांकडून काय भूमिका घेतली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा…बीडच्या गंभीर लोकांना मोठं करण्यामागे पवारांचाही हातभार ; अंजली दमानियांचा जोरदार पलटवार
हेही वाचा…कार्यकर्त्यांची पोलिकांकडून धरपकड, राजू शेट्टींच्या घरी पोहचला पोलिसांचा ताफा
हेही वाचा…शरद पवारांनी पत्राद्वारे मोदींचे मानले आभार, पत्रात नेमकं काय ?