भारतीय संस्कृतीत गुरुला साक्षात परमेश्वर मानले जाते. आज रविवार (दि.५) गुरुपौर्णिमा असून, दरवर्षी गुरुपौर्णिमेचा उत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदा मात्र सर्व सॅण – उत्सवांवर कोरोनाचे सावट असल्याने सर्व भाविक आणि शिष्य परिवार घरीच गुरुपौर्णिमा साजरी करत आहेत.
शहरात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यंदा आषाढ शुद्ध पौर्णिमेला साजरा होणारा गुरुपौर्णिमा सोहळा सार्वजनिकरीत्या साजरा होणार नाही. आज याच गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने भोसरी मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी सोशल मीडियावरून पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना कोरोना विरुद्ध सोशल मीडियावर #MaskForSafePCMC #PCMCFightsCorona अशी मोहीम सुरु करण्याचे आवाहन केले आहे.
आज गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने गुरूदक्षिणा म्हणून या शहराला लवकर कोरोनामुक्त करण्याचा निश्चय करूया असे आवाहन महेश लांडगे यांनी नागरिकांना केले आहे. या मोहिमेद्वारे त्यांनी मास्क लावलेला आपला फोटो सोशल मीडिया वर शेअर करा असे सांगितले आहे. त्यांनी स्वतः एक फोटो शेअर करत या मोहिमेची सुरुवात केली आहे.
दरम्यान, आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची लागण झाली होती. आजच त्यांना व त्यांच्या परिवाराला बिर्ला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांनी स्वतः सोशल मीडियाद्वारे हि माहिती सर्वाना दिली आहे.
‘माझी व माझ्या परिवाराची प्रकृती स्टेबल असून आम्ही आदित्य बिर्ला रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या होम आयसोलेशन द्वारे डॉ.विनायक पाटील यांच्या अंडर संपूर्ण कुटुंब घरीच ट्रीटमेंट घेत आहोत. काळजी नसावी, 15-20 जुलै पर्यंत ट्रीटमेंट सुरु राहिल’ असे महेश लांडगे यांनी सांगितले आहे.