सातारा : ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेतून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडला काढून टाकण्यात आल्यानंतर आता हा वाद चांगलाच पेटला आहे. मालिकेच्या निर्मात्या व अभिनेत्री अलका कुबल यांनी प्राजक्ताला काढून टाकले होते. यानंतर प्राजक्ताने देखील अलका कुबल यांच्यावर आरोप केले होते. आता या मालिकेचा वाद थेट खासदार उदयनराजे भोसले यांच्यापर्यंत पोहचला आहे.
मालिकेतील प्रमुख कलाकार रवी सांगळे यांना मालिकेतून काढून टाकावे अन्यथा साताऱ्यात सुरु असलेले ‘माझी आई काळुबाई’ या मालिकेचं चित्रीकरण बंद पाडण्याची धमकी दिली जात आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर अलका कुबल यांनी आज खासदार उदयनराजे यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी हा वाद मिटवण्यासाठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडसोबत फोनवर चर्चा केल्याची माहिती आहे.
अलका कुबल यांची बाजू घेत उदयनराजे म्हणाले की, अलकाताईच नव्हे, तर इतर कोणाच्याही बाबत असं काही घडत असेल तर मला तुम्ही कधीही हाक मारा, त्यात कुठेही कमी पडणार नाही.
कला क्षेत्रात अनेकांनी आपलं नाव जपलं, त्यापैकी आमच्या भगिनी अलकाताई आहेत. गेली 30 वर्षे प्रामाणिकपणे कलेसाठी आपले आयुष्य देऊन अभिनयाच्या माध्यमातून एक सोशल मेसेज लोकांना देण्याचा अलकाताईंनी प्रयत्न केला. आरोप करणाऱ्यांनी स्वतःच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असेही उदयनराजे म्हणाले.