मराठा आरक्षणाच्या अंतिम सुनावणी दरम्यान आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या युक्तिवादानंतर, ही सुनावणी पुढे ढकलली आहे. आता 1 सप्टेंबरला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगऐवजी प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षण सुनावणीदरम्यान कोणातीही भरती केली जाणार नाही, असं कोर्टात सांगण्यात आलं.
हे प्रकरण 5 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी करा, अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. त्यानुसार 25 ऑगस्ट रोजी निर्णय होणार आहे. जर तसा निर्णय झाला तर 1 सप्टेंबरला ही सुनावणी होणार नाही, ती नव्या तारखेनुसार 5 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल.
कोर्टात 15 जुलैला झालेल्या सुनावणीनुसार आजपासून सलग तीन दिवस सर्वोच्च न्यायालयात सुनावणी नियोजित होती. या तीन दिवसात दोन्ही पक्षकारांना आपआपली बाजू मांडण्यासाठी दीड-दीड दिवसांचा अवधी देण्यात आला होता. यापूर्वी 15 जुलैला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या सुनावणीत, कोर्टाने कोणताही अंतरिम आदेश दिला नव्हता. त्यामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला होता.