कोकणातील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदावरुन मतभेद आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक येथे राज्य मंत्रि मंडळाची बैठक बोलावली.
या बैठकी आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यात एक बैठक झाली. या दोन नेत्यांमध्ये जवळपास अर्धातास चर्चा झाली. या बैठकीत राज्यातील पुढील निवडणुका एकत्र लढवण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (23 जुलै) बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक येथे बैठक बोलावली. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह कोकणातील शिवसेनेचे आमदार आणि खासदार उपस्थित होते. तर राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे, उद्योग आणि पर्यटन राज्यमंत्री आणि रायगडच्या पालकमंत्री मंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या.
या बैठकीत उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्याकडून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यापुढे आपल्याला महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहायचं आहे. तसेच पुढील निवडणुकाही एकत्र लढवायच्या आहेत, असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं, अशी माहिती सूत्रांनी दिली.