पुणे: पुणे महानगर पालिका निवडणुकीचा बिगुल आता वाजलेला आहे. जशी जशी निवडणूक जवळ येत आहे तसतशा राजकीय हालचाली गतिमान होऊ लागल्या आहेत. दिवाळी सणांनंतर मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आता वर्तविली जात आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे बलाबल सध्या जास्त आहे.
शहराध्यक्ष असलेले माजी आमदार जगदीशराव मुळीक यांचा हा स्थानिक मतदारसंघ आहे. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक होम ग्राउंडवर कमी होऊ नये. यासाठी आता मुळीकांना काळजी घ्यावी लागणार आहे. विद्यमान आमदार सुनील टिंगरे विरुद्ध माजी आमदार जगदीशराव मुळीक यांच्यात मोठा राजकीय संघर्ष यावेळी बघायला मिळणार आहे.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरीश बापट यांना ५७ हजार मतांचे मताधिक्य मिळाले होते. जगदीश मुळीक यांना मात्र या विधानसभा मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला होतो. हा पराभव फार काही मोठ्या फरकाने झालेला नाही हे मात्र सगळ्यांना माहित आहे.
२०१७ साली झालेल्या महापालिका निवडणुकीत बहुतांश नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून आले होते. मात्र ते काँग्रेस व राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश करीत नगरसेवक झाले होते. त्यामुळे ते आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये कधीही प्रवेश करू शकता आणि सत्तेच्या नावेत बसण्याचा प्रयत्न करू शकतात.
दोन वर्षात बऱ्याच गोष्टी बदललेल्या आहेत. मुळीक यांचा पराभव करून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे आमदार झाले आहेत आणि चांगलेच सक्रिय झालेले आहेत. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे आणि दोन वर्षात आमदार टिंगरे चांगले काम करत आहेत.
वडगाव शेरी मतदारसंघातून २४ पैकी १६ नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. आमदार टिंगरे यांचे मोठे आव्हान मुळीक यांच्यासमोर आहे. मुळीक हे पक्षाचे शहराध्यक्ष आणि या मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. त्यामुळे मागच्या पराभवाचा वचपा काढण्याची त्यांची तीव्र इच्छा आहे आणि काहीही करून त्यांना आमदार व्हायचे आहे अशी त्यांची मनिषा आहे. आता कोण निवडणूक येणार आणि किती जागा कोणत्या पक्षाच्या येणार हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.