शिवसंग्रामचे अध्यक्ष व आमदार विनायक मेटे यांनी बीडचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केला आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा कहर असताना नुसती पैशाची उधळपट्टी केली जात आहे. जिल्हा शल्यचिकीत्सकांचे लक्ष नुसते खरेदीवर आहे. उपचाराकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप विनायक मेटे यांनी केला आहे.
पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही आता खरेदीतून बाहेर पडून कोरोना उपचाराच्या उपाय योजनांकडे लक्ष द्यावे, असा सल्ला विनायक मेटे यांनी दिला आहे. अलिकडे वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण, रुग्णांचे होत असलेले मृत्यू यामुळे आरोग्य विभाग टिकेचा धनी बनलेला असताना आता विनायक मेटे यांनी खर्चाचा मुद्दा काढून नवीनच बॉम्ब टाकला आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा कहर होण्यास जिल्हा शल्यचिकीत्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी जबाबादार आहेत.
कोविडच्या नावाखाली पैशाची उधळपट्टी केल्याचा आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांनीही आता डोळेझाक करु नये, असेही विनायक मेटे म्हणाले. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार नित्याने पुण्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासह उपाय योजना करण्यासाठी डोळ्यात तेल घालून काम करत आहेत. बीडचे पालकमंत्र्यांनी अलिकडे या विषयाबाबत बैठक घेतल्याचे ऐकिवात नाही असेही विनायक मेटे म्हणाले.
आता त्यांनीही खरेदीतून बाहेर पडावे, असा हल्लाबोलही विनायक मेटे यांनी केला. बीडमध्ये रुग्णसंख्या रोज वाढत आहे. मागच्या चार दिवसांत ११ मृत्यू झाले आहेत. आरोग्य यंत्रणा कोलडमडलेली असताना जिल्हा शल्यचिकीत्सक नुसते सरकारी पैशांची उधळपट्टी करण्यात मश्शगुल असल्याचा गंभीर आरोपही मेटे यांनी केला.