मुंबई : महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा राजकीय बंड करून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर त्यांचे राज्यातील अनेक नेत्यांनी अभिनंदन केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील काल दोन्ही मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आज राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून राजकीय प्रवासाठी सल्ला दिला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना पाठवलेले पत्र
श्री. देवेंद्र फडणवीस
उप-मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
यांसी सस्नेह जय महाराष्ट्र!
प्रिय देवेंद्रजी,
सर्वप्रथम महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री म्हणून आपण जबाबदारी स्विकारल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन. वाटलं होतं की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनच पुन्हा परताल, परंतु ते व्हायचं नव्हतं. असो…
तुम्ही ह्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सलग पाच वर्ष काम केलेत. आत्ताचं सरकार आणण्यासाठीही अपार कष्ट तुम्ही उपसलेत आणि इतकं असूनही आपल्या मनातील हुंदका बाजूला सारून, पक्षादेश शिरसावंद्य मानून उप-मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हातात घेतलीत. पक्ष, पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षेपेक्षा मोठा आहे हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं. पक्षाशी बांधीलकी म्हणजे काय असतं त्याचा हा वस्तुपाठच आहे. ही गोष्ट देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासारखी आहे. खरोखरच अभिनंदन!
आता जरा आपल्यासाठी
ही बढती आहे की अवनती ह्यात मी जात नाही आणि कुणी जाऊही नये. पण एक सांगतो की, धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते. ह्या मागे ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही! तुम्हाला ह्या पुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे.
एक निश्चित की तुम्ही तुमचं कर्तृत्व महाराष्ट्रापुढे सिध्द केलेलंच आहे त्यामुळे देशाच्या भल्यासाठीही तुम्हाला अधिक काम करण्याची संधी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना.
पुन्हा एकदा तुमचं मनःपूर्वक अभिनंदन!
आपला मित्र
राज ठाकरे
श्री. देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन! pic.twitter.com/2TokAB3E1F
— Raj Thackeray (@RajThackeray) July 1, 2022
Read also
- मुंबईच्या भाजपच्या कार्यालयात लग्न सोहळा, पण नवरदेव गायब
- शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेस; अब्दुल सत्तार, भुमरें अन् संजय शिरसाठ यांच्यात वाद
- “हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही”, उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं
- “ना, फडणवीस, ना ठाकरे यंदा एकनाथ शिंदे करणार विठ्ठालाची शासकीय महापुजा”
- सातारा जिल्हा राजकारणाच्या केंद्रस्थानी; एकनाथ शिंदे सातारा जिल्हातील 4 थे मुख्यमंत्री