“कोरोनाचं संकट अभूतपूर्व आहे पण त्या काळात सरकारवर टीका करण्याची वेळ नव्हती. दोन्ही सरकारच्या चुका झाल्या पण ती वेळ राजकारण करण्याची नव्हती म्हणून विरोधी पक्षांनी जबाबदारीने वागायला हवं होतं. भविष्यात ह्यावर बोलू” असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपावर टीका केली आहे.
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या कामावरही टीका केली. कोरोनाच्या काळात मी घराबाहेर जाणं टाळलं कारण मी बाहेर गेलो असतो तर माझ्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली असती त्यातून संसर्गाची भीती होती पण जे सरकारमधल्या लोकांनी मात्र घराबाहेर पडणं आवश्यक होतं. उद्धव ठाकरे टीव्हीवर दिसत होते, त्या सरकारचा कारभार दिसला नाही. राज्य केंद्राकडे बोट दाखवतंय, केंद्र राज्यांकडे बोट दाखवतंय, पण लोकांना ह्याविषयी घेणं देणं नाही. लोकांची एकच अपेक्षा आहे की आम्हाला यातून सोडवा, असे राज ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला टीव्हीवरच दिसले. पण त्यांचा कारभार दिसला नाही. सरकारने कारभाराला सुरुवात केली आणि करोना आला. त्यांच्या कारभाराबद्दल फार काही बोलता येणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस राज्यभर फिरत आहेत. पण मुख्यमंत्री बाहेर फिरताना दिसत नाहीत, असे ते म्हणाले.