येत्या ५ ऑगस्टला अयोध्येत राम मंदिराचे भूमी पूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तसेच सर्व राज्यातील मुखमंत्र्यांना या भूमिपूजनासाठी निमंत्रण देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
पंतप्रधान मोदी 5 ऑगस्ट रोजी सुरुवातीला हनुमानगढीचं दर्शन घेतील. त्यानंतर राम लल्लांचं दर्शन घेतील. राम लल्लांच्या दर्शनानंतर नरेंद्र मोदी मंदिरांचं भूमिपूजन करतील, असं स्वामी गोविंद देव गिरी यांनी सांगितले.
‘राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिलं जाईल. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचं फक्त 150 व्यक्तींना निमंत्रण दिलं जाईल. याव्यतिरिक्त आणखी 50 व्यक्ती या कार्यक्रमात सहभागी होतील. सोशल डिस्टन्सिंगचा विचार करुन निमंत्रित मान्यवरांमध्ये अंतर राहील. याशिवाय कार्यक्रमाला 200 पेक्षा जास्त जण उपस्थित राहणार नाहीत’, असं स्वामी गोविंद देव गिरी यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यासोबतच अनेक नेत्यांना निमंत्रण दिलं जाईल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. ‘पंतप्रधान कार्यालयाला भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे औपचारिक निमंत्रण पाठवण्यात आलं आहे’, असं ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा म्हणाले. दरम्यान, ‘प्रस्तावित मंदिरात संग्रहालयदेखील असणार आहे. यामध्ये भाविक राम जन्मभूमीतून मिळालेल्या पुरातत्वीय कलाकृती बघू शकतील’, असं अनिल मिश्रा यांनी सांगितलं.