औरंगाबादमध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाने विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु केलं. काकासाहेब शिंदे यांच्या बलिदान दिनानिमित्त कायगाव टोका इथं हे आंदोलन केलं जात आहे. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही, तरीही आंदोलन करण्यावर क्रांती मोर्चा ठाम आहे. आंदोलन सुरु केल्याने पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं.
मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सकाळी आंदोलनाच्या दिशेने रवाना झाले. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. पोलिसांनी आंदोलकांना गंगापूर फाटा येथे अडवले. पोलिसांनी आंदोलकांना काकासाहेब शिंदे समाधीस्थळी जाण्यास मज्जाव केला.
मराठा आंदोलनासाठी बलिदान देणाऱ्या काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी, कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी द्यावी या आणि अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जात आहे.
दरम्यान, मराठा आरक्षण खटल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि ओबीसी नेत्यांची बैठक नुकतीच पार पडली होती. या बैठकीत ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती.