‘कोरोना’ विषाणू संसर्गाच्या आपत्तीत ग्राहकसेवेसाठी महावितरणने विशेष यंत्रणा उभारावी तसेच महसूल वाढीसाठी अधिक प्रयत्न करावेत. उपलब्ध मनुष्यबळाचे अंकेक्षण करून या मनुष्यबळाचा सुयोग्य वापर व्हावा यादृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले. मंत्रालयात आयोजित महावितरणच्या आढावा बैठकीत ऊर्जामंत्री डॉ. राऊत बोलत होते.
यावेळी ऊर्जामंत्री म्हणाले, ग्राहकांच्या मीटरचे प्रत्यक्ष रीडिंग घेऊन रिडींगप्रमाणे वीजबिल देण्यात यावे. सरासरी वीजबिल टाळावे, जेणेकरून वीजबिलाच्या तक्रारी कमी होतील. त्यासाठी स्थानिक स्तरावरील कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपवून नियोजन करावे. धनादेशाद्वारे वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांच्या मदतीसाठी विशेष कक्ष स्थापन करावे. कोरोना कारणास्तव प्रतिबंधित क्षेत्रातील (कंटेन्मेंट झोन) वीजबिलाची वसुली वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. एकत्रित वीजबिल एकरकमी भरणाऱ्या ग्राहकांना दोन टक्के सवलत, याशिवाय तीन समान हप्त्यात वीजबिल भरण्याच्या सुविधेबाबत माहिती देऊन ग्राहकांच्या शंकांचे समाधान व त्यांना वीजबिल भरण्यास प्रोत्साहित करावे.
सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या कामाचा अहवाल मागवून अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता तपासावी. बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांची आवश्यकता तपासावी आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण करून मनुष्यबळाचा सुयोग्य उपयोग करावा, असे निर्देश ऊर्जामंत्र्यांनी दिले.