संजय राऊत आणि शरद पवारांची मुलाखत राजकीय हेतून प्रेरित होती. भाजपासोबत निवडून यायचे आणि सत्तेत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत बसायचे ही शिवसेनेची बेईमानी आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
नारायण राणे म्हणाले की, संजय राऊत हे खासदार शिवसेनेचे आणि काम पवारांचे करतात. राज्य सरकारच्या गलथान कारभारापासून लक्ष विचलित करण्यासाठी पवारांची मुलाखत घेतली. पिंजऱ्यात बसून राज्य चालवता येत नाही. शिवसेनेमुळे भाजपाचे १०५ आमदार आले हे कोणाला खरे वाटेल ?, अशी टीका नारायण राणेंनी पवारांवर केली
तसेच देवेंद्र फडणवीस हे शांत स्वभावाचे, मी पुन्हा येईन या शब्दाचा अर्थ कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणण्यासाठी केले होते, त्यात घमेंड कुठून आली? 2014 आणि 2019 मध्ये शिवसेनेचे खासदार, आमदार निवडून आले ते केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे आले, महाराष्ट्राचे खरे शत्रू शरद पवार, शिवसेनाप्रमुखांचे विधान अशी हेडिंग सामनाने दिली होती, आता त्यांचीच मुलाखत घेऊन शिवसेनेचे गोडवे गायले जात आहेत. बाळासाहेब ठाकरे असते तर कदापि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले नसते. ही मुलाखत राज्याच्या गंभीर परिस्थितीकडून लक्ष विचलित करण्यासाठी घेतलेली आहे, देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यासाठी घेतलेली मुलाखत आहे असे राणे म्हणाले.