मुंबई: भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे हे दिल्लीला रवाना झाले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांचा हा दौरा महत्त्वाचा आहे. नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नारायण राणे हे दिल्ली दौऱ्यात भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार आहेत.
नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनासाठी गृहमंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष अमित शाह हे कोकणात आले होते. नारायण राणे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी शिवसेना सोडल्यानंतर काँग्रेसमध्ये आणि त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवलं. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना, मराठा चेहऱ्याच्या निमित्ताने नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो.
सध्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु आहे. मोदी कॅबिनेटमध्ये काही मंत्रिपदांची आदलाबदली, तर काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. त्यातच महाराष्ट्रातील एका भाजप नेत्यांचं केंद्रीय मंत्रिपद धोक्यात असल्याची कुजबूज आहे. त्यामुळे त्यांना हटवून नारायण राणेंसारखा आक्रमक चेहरा दिला जाऊ शकतो. तसेच मराठा आरक्षणाचा मुद्दा असो किंवा शिवसेनेला थेट अंगावर घेण्याचा मुद्दा असो, सध्या भाजपकडे नारायण राणे यांच्यासारखा दुसरा नेता नाही. त्यामुळे ठाकरे सरकारला थेट चॅलेंज देऊन, कोकणात भाजप वाढविण्यासाठी नारायण राणे यांची मदत होऊ शकते, असा अंदाज आहे.