नागपूर महानगरपालिकेतील गदारोळामुळे वादात अडकलेले महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना आता राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस पाठवली आहे. महापालिकामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मानसिक छळ होत असलेल्या तक्रारीमध्ये लिहिण्यात आलं आहे. स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या कंपनी सेक्रेटरी भानुप्रिया ठाकूर यांनी महिला आयोगाकडे तक्रार केली होती.
तुकाराम मुंढे यांनी प्रसुती हक्क नाकारले. तसेच नोकरीवरुन काढून टाकण्यासाठी कारणे दाखवा नोटीसही पाठवली होती. मुंढे यांनी आपल्याला अपमानजनक वागणूक दिल्याचे आणि आपला मानसिक छळ केल्याचा आरोप ठाकूर यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.
भानुप्रिया ठाकूर यांच्या तक्रारीची नोंद घेता आता राष्ट्रीय महिला आयोगाने तुकाराम मुंढे यांना नोटीस पाठवली असून, त्यांना उत्तर देण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच महापालिका क्षेत्रातील लॉकडाऊनच्या अंमलबजावणीवरुन तुकाराम मुंढे आणि सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये वाद झाला होता. नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी तुकाराम मुंढे यांच्याविरोधात तक्रार देखील दाखल केली होती.