अमरावती – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यूपीएचे अध्यक्ष होणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. राजकारणाच्या क्षेत्रात कोणी शरद पवारांचा हातही धरु शकत नाही, असं मत नवनीत राणा यांनी व्यक्त केलं
“आमचे पवार साहेब महाराष्ट्राची शान आहेत. महाराष्ट्रात कोणतीही गोष्ट इथून तिथे गेली असेल, तर ते फक्त शरद पवारच करु शकतात. एनिथिंग इज पॉसिबल, ते सगळ्यात सिनिअर नेते आहेत. आणि राजकारणाच्या क्षेत्रात कोणी त्यांचा हातही धरु शकत नाही. त्यामुळे जे होईल ते शरद पवारांच्या इच्छेनुसार होईल.” असं मत नवनीत राणा यांनी व्यक्त केलं.
नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष खासदार आहेत. मात्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासकामांचा गौरव करत मोदींना पाठिंबा दर्शवला आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देण्यासाठी शरद पवार यांच्या पाठीमागे काँग्रेस खंबीरपणे उभी आहे. येत्या काही काळात शरद पवार यूपीएचे अध्यक्ष होतील, अशा बातम्या गुरुवारी दिवसभर माध्यमांमध्ये येत होत्या. मात्र या बातमीचं खंडन करत यामध्ये तथ्य नसल्याचं स्वत: शरद पवार यांनी स्पष्ट केलं.