उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली आहे. यावेळी पार्थ पवार यांनी सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
“सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी योग्य तपास व्हावा अशी संपूर्ण देश, विशेषत: तरूणाईची अपेक्षा आहे. ही भावना लक्षात घेत याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे,’ असं ट्वीट पार्थ पवार यांनी केले आहे. विशेष म्हणजे पार्थ पवार यांनी आपल्या या ट्वीटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान कार्यालयालाही टॅग केले आहे.
दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वीच याप्रकरणी सीबीआय चौकशीची आवश्यकता नसल्याचं म्हटलं होतं. अशातच पार्थ पवार यांनी मात्र सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतच या विषयावरून वेगवेगळे मतप्रवाह असल्याचं दिसत आहे.