कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी डॉक्टर पुढे येत नसल्याच्या तक्रारी येतात. नाशिकमध्ये तर आरोग्य विज्ञान विद्यापीठातून डॉक्टर्स तयार होतात. असे असतांनाही डॉक्टर्स पुढे येत नाहीत हे दुर्दैव आहे. मात्र आता अशा प्रकारे सेवा नाकारणार्या डॉक्टरांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्याची वेळ आणू नये असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष . शरद पवार यांनी दिला ते नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
खासगी रुग्णालये जास्तीचं बिल घेत आहेत. त्यांचे ऑडिट केलं जात असून, यापुढे कडक तपासणी केली जाणार आहे. डॉक्टरांनीही आपत्ती व्यवस्थापन कायदा वापरण्याची वेळ आणू नये. आर्थिक संकट मोठं आहे. लॉकडाउनचा निर्णय स्थानिक पातळीवरच घेण्यात यावा. मात्र, स्थानिक पातळीवर आरोग्य सुविधा कशा प्रकारच्या आहे, त्यावरून लॉकडाउनचा निर्णय घेण्यात यावा, असं शरद पवार म्हणालेत.
दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नाशिकला भेट देण्याची इच्छा आहे, ते येतीलच. पण आम्ही आमचे निरीक्षण घेत आहोत. मुख्यमंत्री धोरणात्मक निर्णय घेतील. मात्र, देवेंद्र फडणवीस व भाजपनं राजकारण करू नये, अशी टीका पवार यांनी केली.