अहमदनगर : राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे कोव्हिड सेंटर उभारले आहे. आमदार निलेश लंके यांनी कोव्हिड सेंटर उभारुन कोरोनाग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. भाजप आमदार श्वेता महाले यांनी नुकतीच या कोव्हिड सेंटरला भेट दिली. यावेळी महाले यांनी लंकेंचं काम राज्यात आदर्शवत असल्याचं सांगत कौतुक केलं. भाजप आमदाराने राष्ट्रवादीच्या आमदाराचं कौतुक केल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आलं आहे.
जागतिक कोरोना महामारीने राज्यात थैमान घातले आहे. त्यामुळे रुग्णांना आधार देण्याच्या उद्देशाने आमदार निलेश लंके यांनी आपल्या मतदारसंघामध्ये ११०० बेडचे कोविड केअर सेंटर उभारले आहे. त्यामुध्ये १०० ऑक्सिजन बेड आहेत. तर उर्वरित बेड संभाव्य लक्षणे जाणवत असलेल्या सर्वसाधारण रुग्णांसाठी आहेत. विशेषत म्हणजेच आमदार निलेश लंके स्वत: या कोविड केअर सेंटरमध्ये कार्यरत असतात. आज भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी निलेश लंके यांची भेट घेतली.
“आमदार निलेश लंके हे विधानसभेतील आमचा चांगले सहकारी आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव नसतानाही ते गेल्या दोन वर्षांपासून कोरोना काळात राज्यात आदर्श काम करत आहेत” अशा शब्दात श्वेता महाले यांनी निलेश लंके यांच्या कामाचं कौतुक केलं. विरोधीपक्ष भाजपच्या आमदार असताना सत्ताधारी राष्ट्रवादीच्या आमदाराचं कौतुक महालेंनी केल्यामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आलं आहे.