राज्यात कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यातील अनेक नेत्यांना कोरोनाने आपल्या जाळ्यात अडकवले आहे. आता राष्ट्रवादीच्या राज्यसभा खासदार फौजिया खान यांना कोरोनाची लागण झाली आहे. राष्ट्रवादीचे परभणी जिल्ह्याध्यक्ष आणि आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्यापाठोपाठ आणखी एका लोकप्रतिनिधीला कोरोनाचा संसर्ग झाल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे.
फौजिया खान यांच्या अँटीजन टेस्टमध्ये कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुंगळीकर यांनी दिली. यापूर्वी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार बाबाजानी दुर्रानी यांचा स्वॅब पॉझिटिव्ह आला होता.
महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रीपद सांभाळणाऱ्या फौजिया खान या राज्यातील पहिल्या मुस्लिम महिला आहेत. फौजिया खान अखिल महाराष्ट्र अल्पसंख्याक शिक्षण संघटनेच्या (फेम) प्रमुख असून परभणीमध्ये अनेक शैक्षणिक संस्था चालवतात.