पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांना ‘विधान परिषद देवून सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला अर्थात ‘राम-लक्ष्मण’ जोडीला शह देण्यात येईल. त्यासाठी उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची ‘एनओसी’ घेण्यासाठी कलाटे हितचिंतकांनी मोर्चेबांधणी सुरू केली. कलाटे स्वत: विधान परिषदेसाठी तीव्र इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.
पिपंरी-चिंचवड महापालिका पुन्हा हस्तगत करणे…हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्धार आहे. पण, महाविकास आघाडी (शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस) च्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडच काय? पुणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतेही मोठे पद द्यायचे नाही, असा अलिखित करार झाला आहे. त्यामुळे पवारांच्या ‘एनओसी’ शिवाय राहुल कलाटे यांना संधी मिळणार नाही. या कारणामुळे कलाटे यांचे राष्ट्रवादीतील दिग्गज ‘हितचिंतक’ खासदार आणि राष्ट्रवादीतील सहकारी अजित पवारांकडे ‘देव पाण्यात ठेवून’ आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये सध्यस्थितीला आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्यानंतर भाजपा आणि पर्यायाने जगताप यांना खुले आव्हान देणारा एकमेव चेहरा म्हणून राहुल कलाटे यांची ओळख आहे. यापूर्वी २०१४ आणि २०१९ अशा दोन्ही विधानसभा निवडणूका कळते यांनी लढवल्या यात २०१९ च्या निवडणुकीत कलाटे यांना मिळालेली सुमारे सव्वा लाख मते ही जगताप यांच्या जिव्हारी लागली. तर महापालिका निवडणुकीत जगताप विऱोयुद्ध कलाटे असा सामना रंगणार असल्याने भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेकडे कलाटे ‘हुकमी एक्का’ आहे.
तर दुसरीकडे भोसरी मतदारसंघात आमदार महेश लांडगे यांचा शह देण्यासाठी शिवसेनेतून सुलभा उबाळे किंवा धनंजय आल्हाट यांना प्रदेश पातळीवर संघटनेत महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, कामगार क्षेत्रात मजबूत पकड निर्माण केलेले इरफान सय्यद यांनाही पक्षाकडून मोठी जबाबदारी देण्याची शक्यर्ता वर्तवली जात आहे. त्यामुळे भाजपा शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे यांची डोकेदुखी वाढणार आहे. त्याचा अप्रत्यक्ष फायदा राष्ट्रवादीला होणार आहे
दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात भाजपाची ताकद चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे आमदार शहराध्यक्ष महेश लांडगे अशी विभागली आहे. या दोन दिग्गज नेत्यांच्या जीवावर भाजपा महापालिकेत पुन्हा ‘कमळ’ फुलवण्याच्या प्रतीक्षेत आहे. शहरात शिवसेनेची ताकद आहे. पण, नगरसेवक संख्या केवळ ७ आहे. पिंपरी विधानसभा मतदार संघही शिवसेनेने गमावला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये राहुल कलाटे यांना संधी मिळाल्यास शिवसेनेला उर्जा मिळणार आहे. शिवसेनेची ताकद वाढली, तर अप्रत्यक्षपणे भाजपाला फटका बसणार आहे. त्याचा फायदा राष्ट्रवादीला होणार आहे.