पुणे : पाणीपट्टी थकवल्याने पुणे महानगरपालिकेने भाजप नेते निलेश राणे आणि संजय काकडे यांना नोटीस बजावली आहे. दोन्ही नेत्यांनी तब्बल ८३ लाखांची पाणीपट्टी थकवली आहे. यामध्ये भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांच्या मालकीच्या कंपन्यांची थकबाकी जवळपास 66 लाख आणि निलेश राणे यांची थकबाकी जवळपास 17 लाख रुपये आहे.
महापालिकेने 200 कोटी रूपयांची पाणीपट्टी थकविणाऱ्या 856 जणांची यादी जाहीर केली आहे. या यादीत संजय काकडे आणि निलेश राणे यांच्यासह अनेक शिक्षणसंस्था, मोठी व्यावसायिक संकुले व बांधकाम व्यावसायिकांचा समावेश आहे.
महापालिकेने वसुली मोहिमेत सर्वप्रथम 10 लाख रुपयांहून अधिक थकबाकीदारांकडे महापालिकेने आपला मोर्चा वळविला आहे. या थकबाकीदारांची यादी पुणे महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. थकबाकी न केल्यास कारवाई होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. पुण्यात भारतीय जनता पक्षाच्या बाजूने मोठमोठ्या वल्गना करणाऱ्या संजय काकडे यांना थकलेली पाणीपट्टी भरण्याचीही तसदी घ्यावी वाटत नाही, हे जितके निषेधार्ह आहे, तितकेच लाजीरवाणेही आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
Read Also :