अभिनेता सुशांत सिंहच्या बँक खात्यातून रिया चक्रवर्तीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्याच्या अनेक बातम्या समाज माध्यमात फिरत होत्या. पण रियाच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्स्फर न झाल्याचे आतापर्यंतच्या तपासात आढळून आलं असून याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सांगितले. परमबीर सिंह यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासाविषयी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
एखादी घटना घडल्यानंतर झालेल्या पोलीस तपासात पहिला जबाब हा महत्वाचा मानला जातो. सुशांतच्या घरच्यांशी झालेल्या पहिल्या जबाबात त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नव्हता. सुशांतवर सुरु असलेले उपचार आणि व्यावसायिक दडपणामुळे आत्महत्या केली असावी असे त्यांचे म्हणणे होते. पण त्यानंतर त्याच्या वडीलांना नंतर बिहारमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर सुशांतचे कुटुंबीय जबाबासाठी आले नाहीत आणि त्यांनी थेट बिहारमध्ये तक्रार केली असे परमबीर सिह यांनी सांगितले आहे .
सुशांत आत्महत्येप्रकरणात आतापर्यंत ५६ लोकांचे जबाब नोंदवून घेतले असून सर्वांची सविस्तर चौकशी करण्यात आली. मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवलेल्या ५६ लोकांमध्ये रिया चक्रवर्तीचाही समावेश आहे. रियाचा जबाब दोन वेळा नोंदवला गेला. तिला पोलीस ठाण्यातही अनेकदा बोलावले गेले.