नाशिक : राज्यात एकीकडे ऑक्सिजन अभावी करोना बाधित रुग्णांचे हाल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत असताना, नाशिकमध्ये आज दुपारी १२ च्या सुमारास, डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या ऑक्सिजन टाकीतून मोठ्या प्रमाणात वायू गळती होऊन, तब्बल २२ रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान, गळती पूर्णपणे बंद करण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे.
आज सकाळच्या सुमारास रुग्णालयाच्या मोठ्या ऑक्सिजन टाकीचा कॉक नादुरुस्त असल्याने, त्यातून गळती सुरू झाली. ही गळती रोखण्यासाठी जेव्हा तंत्रज्ञ कारागीर दाखल झाले आणि दुरुस्तीचे काम सुरू झाले, त्याचवेळेस नादुरुस्त कॉक पूर्णपणे तुटला. नवीन कॉक बसवून गळती थांबविण्यासाठी २ तासांचा कालावधी लोटला. परंतु या घटनेमुळे रुग्णालयाच्या आवारात नातेवाईकांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश पाहायला मिळाला
डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय हे महापालिकेचे कोविड रुग्णालय आहे. यात अनेक रुग्ण ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटरवर आहेत. या घटनेमुळे हॉस्पिटलमधील ऑक्सिजन पुरवठ्याचा दाब पूर्णपणे कमी झाला. त्यामुळे रुग्णालयातल्या व्हेंटिलेटरवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची प्रकृती अचानक खालावली आणि रुग्ण एका पाठोपाठ दगावण्यास सुरुवात झाली.
दरम्यान, या दुर्घटनेतील जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तसेच या दुर्दैवी घटनेची संपूर्णपणे उच्चस्तरीय चौकशी केली जाईल आणि दोषी असणार्यांवर कारवाई करणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.