प्रतिनिधी: विवेक पानमंद
पंढरपूर: पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी 38 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी आठ उमेदवारांचे अर्ज अवैध झाले होते. उर्वरित 30 पैकी किती उमेदवार अंतिम मुदतीमध्ये उमेदवारी मागे घेतात, याविषयी उत्सुकता होती. प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांचे चुलत बंधू , मंगळवेढा तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे, पंढरपूर नगरपालिकेतील सत्ताधारी परिचारक यांच्या आघाडीच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांचे पती, पंढरपूर मर्चेट बँकेचे अध्यक्ष नागेश भोसले, शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार शैला गोडसे हे कोणती भूमिका घेतात, याकडे दोन्ही तालुक्याचे लक्ष लागले होते.
सिद्धेश्वर आवताडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते – पाटील यांनी त्यांच्याशी चर्चा केली होती. परंतु सिद्धेश्वर आवताडे हे त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. काल शुक्रवारी पुन्हा आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सिद्धेश्वर आवताडे यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली, परंतु तरीही सिद्धेश्वर आवताडे यांनी कोणत्याही परिस्थितीत आपण निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले होते. सिद्धेश्वर आवताडे यांनी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे समाधान आवताडे यांना राजकीय विरोधकांच्या बरोबरच कौटुंबिक बंडखोरीचा सामना करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच शैला गोडसे यांनीही उमेदवारी कायम ठेवली आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये महेंद्र काशिनाथ जाधव (पीपल्स रिपब्लिकन पार्टी) , नागेश भोसले (अपक्ष), मोहन नागनाथ हळणवर (अपक्ष), इलियास हाजीयुसूफ शेख (अपक्ष), संजय चरणू पाटील (अपक्ष), अमोल अभिमन्यू माने (अपक्ष ), रामचंद्र नागनाथ सलगर (अपक्ष), मनोज गोविंदराव पुजारी (अपक्ष), बापू दादा मेटकरी (अपक्ष), अशोक ज्ञानदेव वाघमोडे (अपक्ष), रज्जाक ऊर्फ अब्दुलरोफ जाफर मुलाणी (अपक्ष) या 11 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. मतदान शनिवार, 17 एप्रिल 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत होणार असून, मतमोजणी रविवार, 2 मे 2021 रोजी होणार असल्याचेही निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी या वेळी सांगितले.