महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायांत हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान लक्षात घेऊन हा उद्योग परत सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली होती. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात हॉटेल आणि लॉज सुरु करण्याची परवानगी मिळाली आहे. येत्या 8 जुलैपासून हॉटेल आणि लॉज सुरु केले जाणार आहेत.
नुकतंच मुख्य सचिव यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. मात्र कंटेन्मेंट झोनमध्ये सध्या तरी हॉटेल आणि लॉज सुरु करता येणार नाही, असे यात नमूद करण्यात आले आहे. लॉज, गेस्ट हाऊस अशा सुविधा पुरवणारी कंटेन्मेंट झोनबाहेरील हॉटेल्स 33 टक्के क्षमतेसह चालवण्याची 8 जुलैपासून परवानगी देण्यात आली आहे.
मात्र हॉटेल चालू ठेवताना काही सूचनांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे, जसे कि, कोव्हिडपासून बचावासाठी उपाययोजनांची माहिती देणारे फलक/पोस्टर/एव्ही मीडिया दर्शनी भागात लावावेत. हॉटेल आणि पार्किंगसारख्या भागात गर्दीचे योग्यरित्या नियोजन करावे. रांगा किंवा आसन व्यवस्थेत सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी वर्तुळे आखावीत, प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्क्रीनिंग बंधनकारक. रिसेप्शन टेबलजवळ प्रोटेक्शन ग्लास आवश्यक, पायाने वापरता येणारी (पेडल ऑपरेटेड) हँड सॅनिटायझर मशीन रिसेप्शन, गेस्ट रुम, लॉबी इथे मोफत उपलब्ध करावीत.
त्याचप्रमाणे फेस मास्क, फेस कव्हर, ग्लोव्हज या गोष्टी हॉटेल कर्मचारी आणि ग्राहक या दोघांसाठी उपलब्ध करावीत. चेक इन आणि चेक आऊट करण्यासाठी QR कोड, ऑनलाईन फॉर्म, डिजिटल पेमेंट, ई-वॉलेट अशी विनासंपर्क वापरता येणारी प्रणाली ठेवावी. सोशल डिस्टन्सिंग पाळून लिफ्टमधील व्यक्तींची संख्या मर्यादित ठेवावी. एसी- सीपीडब्ल्यूडीच्या मार्गदर्शक सूचना पाळाव्यात. सर्व एअर कंडीशनचे तापमान 24 ते 30 अंश सेल्सिअस या मर्यादेत असावे. आर्द्रता 40 ते 70 टक्के राखावी. ताजी हवा खेळती राहावी यासाठी क्रॉस व्हेंटिलेशन उत्तम असावे.
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव आणि इतर अधिकाऱ्यांची हॉटेल असोसिएशसोबत काल (5 जुलै) एक व्हिडीओ कॉन्फ्रेसिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीत त्यांनी लवकरच हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.