पिंपरी-चिंचवड : राज्यातल्या महामारीशी लढणाऱ्या यंत्रणांमध्ये पोलीस प्रशासन देखील महत्वाची जबाबदारी निभावत आहे. परंतु, या काळात सर्वच यंत्रणांवर मर्यादेबाहेरचा ताण येत असून, आपल्यासारखीच सामान्य माणसं असणाऱ्या या यंत्रणेतील लोकांचा देखील केव्हातरी तोल ढासळला गेल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर, त्रस्त जनतेशी पोलिस कसे वागतात. त्यांना तत्परतेनं हवी ती मदत, दिलासा देतात की नागरिकांना त्यांचाही मनस्ताप होत आहे, याचा प्रत्यक्ष अनुभव पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी स्वतः वेषांतर करून बुधवारी मध्यरात्रीनंतर घेतला. यावेळी त्यांच्यासोबत एसीपी प्रेरणा कट्टे यादेखील वेषांतर करून सोबत होत्या.
दोन तासांच्या या पाहणी दौऱ्यांत आयुक्तांनी पिंपरी, वाकड आणि हिंजवडी या पोलिस ठाण्यांना मियॉं जमालखान कमालखान पठाण बनून भेट दिली, तर एसीपी प्रेरणा कट्टे या त्यांच्या बुरख्यातील बिवी बनून गेल्या होत्या. त्यांच्या या परिक्षेत दोन पोलिस ठाणी पास, तर एक नापास झाले.
दरम्यान, त्यांनी या मोहिमेची सुरुवात, पिंपरी पोलीस ठाण्यापासून केली. टॅक्सी करून हे जोडपे मध्यरात्री सव्वाबारा वाजता पिंपरी पोलिस ठाण्यात गेले. शेजाऱ्याला कोविडसाठी रुग्णवाहिका पाहिजे. पण, त्यासाठी आठ हजार रुपये मागितले आहेत. तुम्ही तक्रार घ्या असे सांगत त्यांनी रुग्णवाहिकेचा नंबर संबंधित ड्युटी ऑफिसरला दिला. मात्र, हे आमचे काम नाही, असे सांगत त्यांना तेथून पिटाळण्यात आले.
त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा रात्री दीडला हिंजवडी पोलिस ठाण्याकडे वळवला. तेथे त्यांनी पत्नीची सोन्याची चेन हिसकावल्याचे सांगितले. यावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया लगेच होऊन, दोन वाजता ते वाकड पोलिस चौकीवर दाखल झाले.
तिथे रमजानच्या उपवासात परिसरात रोज फटाके वाजवतात, त्याचा त्रास होतो, असे सांगितले तसेच याचा जाब विचारला, तर माझ्या बायकोची छेड काढली गेली आणि मला मारहाण केली असे त्यांनी सांगितले. ड्युटी ऑफिसरने ही तक्रार, तर नोंदवून घेतलीच, शिवाय प्रकार गंभीर असल्याने वरिष्ठांना बोलावतो असे सांगून तोपर्यंत थांबण्याची विनंती केली.
त्यामुळे चांगला अनुभव सर्वसामान्य जनतेला दिलेल्या ठाण्यांतील पोलीस ड्यूटी ऑफिसरला ते प्रमाणपत्रासह बक्षिसी, तर फेल असलेल्या पोलिस ड्यूटी ऑफिसरला ते मेमो देणार आहेत. तसेच पुन्हा असे वेषांतर करणार असल्याचे सांगितल्याने शहर पोलिसांची जनतेप्रतीची वागणूक आता आणखी सुधारेल, यात शंका नाही.