पिंपरी चिंचवड : पिंपरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे याला अखेर रत्नागिरीतून अटक केली आहे. तो खुनाच्या प्रयत्नांच्या दोन गुन्ह्यांत संशयित आरोपी होता. गेली जवळपास 15 दिवसांपासून पोलीस सिद्धार्थचा शोध घेत होते. मात्र, आमदार पुत्र सिद्धार्थ पकडण्यात उशीर झाल्याने कृष्ण प्रकाश यांच्यावर राजकीय दबाव आहे का ? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
काय आहे प्रकरण?
आमदार अण्णा बनसोडे यांनी 12 मे रोजी त्यांच्या दिशेने तानाजी पवारने गोळीबार केल्याचा दावा केला होता. मात्र, खरचं गोळीबार झाला का हे अद्याप समोर आलेले नाही. याप्रकरणातील आरोपी तानाजी पवारने उलट आमदार पुत्र सिद्धार्थ बनसोडे आणि त्याच्या साथीदारांवरच अपहरण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. तानाजी पवार यांच्या कंपनीकडूनही सिद्धार्थवर कर्मचाऱ्याला मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात पोलिसांना सिद्धार्थ बनसोडेचा शोध सुरू होता. अखेर रत्नागिरी जिल्ह्यातील पावसमधून त्याला अटक करण्यात आली.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश भडकले
सिद्धार्थ बनसोडेला अटक करण्यात आल्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना मात्र पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश भडकल्याचे पाहायला मिळाले. गोळीबार हा आमदार अण्णा बनसोडे यांच्या दिशेने झाला हे तपासात स्पष्ट झालं का?, असा सवाल करताच कृष्ण प्रकाश पडकल्याचे पाहायला मिळाले.
तुम्ही पत्रकार नियोजनबद्ध कट रचून आलेला आहात. आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे याला आणि त्यांच्या साथीदारांना अटक केली. इतकी चांगली आणि कठोर कारवाई करुनही तुम्ही प्रश्न विचारत आहात. तुम्हाला कुणी असे प्रश्न विचारा म्हणून नियोजन करुन पाठवले आहे का? असा प्रश्न विचारतानाच मी जे बोलतो तेच करतो, असे आक्रमक होत त्यांनी उत्तर दिले.
15 दिवस आमदार पुत्र कुठे होता ?
याआधी अण्णा बनसोडे यांनी गोळीबाराचा बनाव केला असेल तर आमदारांवर गुन्हा दाखल करणार का? या प्रश्नाचे उत्तर देणे देखील कृष्ण प्रकाश यांनी टाळले होते. तसेच, गेली अनेक दिवस आमदार पुत्राला पकडू शकले नव्हते ? यामुळे पोलीस आयुक्तांवर दबाव तर नाही ना ? अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. आयर्न मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृष्ण प्रकाश यांची राष्ट्रवादीसोबत सेटमेंटल तर झाली नाही ना ? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात होता. आता अखेर कारवाई करत सिद्धार्थ बनसोडे याला रत्नागिरीतील पावसमधून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
Read Also :