विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी साताऱ्यातील जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन तेथील आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी बोलताना दरेकर म्हणाले की, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारमधील सत्ताधारी पक्षातील प्रमुख नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या गावीच कराड शासकीय कॉटेज हॉस्पिटल येथील कोविड सेंटरची मान्यता रद्द करावी लागत असेल तर यापेक्षा दुदैव काय. यावरुनच साताऱ्यातील कोविड परिस्थितीची ‘शितावरुन भाताची परीक्षा’ करता येते.
दरेकर यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह वऱ्ये गावातील सावकार आयुर्वेदिक कॉलेज येथील क्वारंटाइन सेंटरला भेट दिली. तसेच साताऱ्यातील वाढत्या कोविडच्या परिस्थितीसंदर्भात साताराचे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्यासोबत चर्चा केली.
दरेकर यांनी सांगितले की, माजी मुख्यमंत्र्यांच्या गावातच कोव्हिडची परिस्थिती गंभीर आहे. कराड शासकीय कॉटेज हॉस्पिटलला कोव्हिड हॉस्पिटलची मान्यता दिली होती. परंतु तेथे योग्य इमारत नाही, सोयी-सुविधा नाहीत, आरोग्य व्यवस्थेचा तुटवडा आहे. तेथे काम करणाऱ्या नर्सेसना करोना प्रार्दुभाव झाल्यामुळे हॉस्पिटलची कोव्हिडची मान्यता रद्द करण्याची नामुष्की आली. ही जर सत्ताधारी नेत्यांच्या गावची परिस्थिती असेल तर जिल्ह्याचे व महाराष्ट्राचे काय, असा सवालही दरेकर यांनी यावेळी उपस्थित केला.
सातारामध्ये कोविडची परिस्थिती गंभीर आहे. येथे सुमारे ४० टक्के मनुष्यबळाची कमतरता आहे. राज्य सरकार एका बाजूला कोविडसाठी सुसज्ज खाटांची इमारती, खासगी रुग्णालये, क्वारांटाइन सेंटर उभे करत असले तरी साताऱ्याच्या शासकीय रुग्णालयात मुख्य फिजीशिअनच नाही. १० ते १२ डॉक्टर व ५० टक्के नर्सेसची कमतरता असून येथील वैदयकीय पदे तात्काळ भरण्याची आमची मागणी आहे. जिल्हा रुग्णालयातही केवळ ६ व्हेंटिलेटर्स असून ही संख्या अपुरी आहे. साताऱ्यामध्ये संकटाची स्थिती असून जिल्हाधिकाऱ्यांनी आता युद्धपातळीवर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.