मुंबई – राज्याच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून विरोधक आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. अधिवेशनाला सुरुवात होताच विरोधकांनी गदारोळ घातला. कामकाज सुरु होण्यापूर्वीच विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. कामकाजाला सुरुवात होण्याआधीच भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार उभे राहिले आणि कामकाजाची नियमावली ठरवण्याची आवश्यकता आहे असं सांगत संताप व्यक्त केला.
त्यानंतर आमदार रवी राणा यांचा पोशाख पाहून विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. यावरून विरोधक अजूनच आक्रमक झाले. आणि पुन्हा एकदा अधिवशेषणात गदारोळ सुरु झाला.
विधानसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली. या दरम्यान शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या विषयावर आमदार रवी राणा यांनी निषेधाचे बॅनर असलेला पोषाख घालून सभागृहात प्रवेश केला. यावरुन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली. पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रवी राणा यांच्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निषेध करत मुख्यमंत्र्यांनी दखल घेण्याची मागणी केली. यानंतर अध्यक्षांनी रवी राणा यांना बाहेर जाण्यास सांगितले.